शुक्रवार, १८ जुलै, २०१४

हिवाळा


न्हालेल्या जणू गर्भवतीच्यासोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येईमाघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतलअचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्हीपितात सारे गोड हिवाळा
डोकी अलगद घरे उचलतीकाळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळीकावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडेकाळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनीसागरपक्षी सूर्य वेचती
गंजदार पांढर्‍या नि काळ्यामिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटीसाखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमलगरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचाभुर्‍या शांततेचा निशिगंध
या सृष्टीच्या निवांत पोटीपरंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईलजिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरीअचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतलउरे घोटभर गोड हिवाळा
बा. सी. मर्ढेकर

सोमवार, १४ जुलै, २०१४

अधिकार


तू मला खरंचं खूप खूप आवडतेस...”
असं सांगतानाही,
तुझा चेहरा होतो आंबट,
अन् मग किरकिऱ्या आवाजात म्हणतोस,
फक्त ही Hair Style Change कर.
फार outdated वाटतेस.
मी आहे तशीच तू मला का स्वीकारू शकत नाहीस?
मी बाह्यरूपाला भुलत नाही.”
असं सांगतानाही,
तुझा भर असतो तो माझ्या दिसण्यावरच
माझी gf माझ्यासारखी smart नको का दिसायला?
असं ही हसून म्हणतोस.
मग ठरलेलं आहे माझं हलकसं हसणं
काळाशी सुसंगत वागायला शीक.”
असा सल्ला देतानाही,
तू मला विचारतोस,
जन्मपत्रिकेतील नाडी
आणि मग कारणही देतोस समर्पक,
जन्मपत्रिकेत नाडी समान असेल तर लग्नासाठी पत्रिका जुळत नाही
अन् ओघाने विचारतोस
गण, गोत्र, रास, नक्षत्र...
अन् मग अगदी दबक्या स्वरातला प्रश्न
तुला मंगळ वगैरे तर नाही ना?
त्याचबरोबर सुरु होतं आडून आडून विचारणं,
तुला जेवण येतं का?
शिवण येतं का?
कधीतरी मधेच call करतोस खोटा बहाणा करून,
आज दाढ दुखतेय,
घसा खवखवतोय,
पोट बिघडलंय,
तुला फक्त जाणून घ्यायचं असतं ते इतकंच की,
मला घरगुती उपचार किती माहित आहेत?
कधीतरी भेटायला येतोस आणि सांगत राहतोस माझी आई,
माझे वडील,
माझं त्याच्यावर असणारं प्रेम,
तुला सुचवायचं असतं ते इतकंच की,
मी आई वडिलांच्या आज्ञेबाहेर नाही...

एवढं सारं असूनही तू प्रयत्न करत राहतोस मला हे समजावून देण्याचा की
माझं तुझ्यावर कित्ती प्रेम आहे..
नेमका कोणता शोध घेतोयस तू?
तुला एक smart good looking gf हवीये का?
तुला suitable अशी?
कि सुयोग्य पत्रिका हवीये?
कि तुझ्या घराच्या चार भिंतीआड नेटका संसार करणारी
एक टिपिकल गृहिणी?
तुझ्या असंख्य अपेक्षा मला मान्य आहेत.
हो, खरंच मान्य आहेत.
माझ्या मात्र तुझ्याकडून अशा कोणत्याच अपेक्षा नाहीत.
फक्त एक मागणी आहे.
वेळप्रसंगी मला फक्त एका निर्णयाचा अधिकार दे.
तुला नाकारण्याचा.....

शनिवार, १२ जुलै, २०१४

पत्र गुरुपौर्णिमेनिमित्त

माझा विश्वासघात करणाऱ्या एका व्यक्तीस,

आज गुरुपौर्णिमा, तुला गुरु वगैरे मानावं इतका तू महान नाहीस. पण तरीही तू माझा गुरु आहेस. जे अगाध ज्ञान मला पुस्तकातून मिळू शकले नसते ते तू मला दिलेस. प्रश्न पडला असेल ना कि तू असं काय केलं आहेस? सांगते ना मी तुला. सांगितल्याशिवाय कशी राहीन?
तू मला जाणीव करून दिलीस कि माझ्यात काहीतरी असं आहे कि जे क्षणकाळासाठी का होईना कुणाला तरी आवडू शकेल. कुणाचा काही काळ तरी माझ्या सानिध्यात चांगला(?) जाऊ शकेल. तूच मला जाणीव करून दिलीस कि मलाही कुणा अनोळखी व्यक्तीशी मैत्री करता येऊ शकते. खरंचं तू मला समजावलंस मी कसं राहिलं पाहिजे? मी कसं दिसलं पाहिजे? मी कसं वागलं पाहिजे? तू मला समजावलंस... तू मला शिकवलंस माझ्या उडत्या केसांना आवळ घालायला.. तू मला शिकवलंस माझ्या निरलस शब्दांच्या निर्झराला बांध घालायला.. तू मला शिकवलंस मुलीप्रमाणे राहायला... तू मला शिकवलंस...
आणि त्यानंतर तूच तुझ्या वागण्याने सिद्ध करून दाखवलस वरच्या शिक्षणाचं फोलपण.. त्या सततच्या बदलांचं निरर्थकपण.. हो. तू पुसून टाकलीस जुनी पाटी आणि नव्याने गिरवून घेतलास नवा अध्याय अगदी स्वतःच्याही नकळत.. आणि मी शिकले कुणासाठी कधीच बदलू नये.. कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वतःला विसरू नये.. कुणाच्या गोड बोलण्याला भुलू नये.. कुणावर कधीच विश्वास ठेऊ नये.. हो तू मला हे सारं शिकवलंस....

आता मी केसांना पट्टयात आवळत नाही.. आता मी पूर्वीसारखं गोड गोड बोलत नाही.. आता मी मुलींसारख मुळूमुळू वागत नाही.. आणि सर्वात महत्त्वाचं आता मी कुणावरही विश्वास ठेवत नाही.. खूप खूप शिकवलंस तू मला.. तुझ्या सारखा गुरु(?) मला लाभला हे तर माझे अहोभाग्यच(?). म्हणूनच मी अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने तुला अभिवादन करते. आणि हो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 

शुक्रवार, ११ जुलै, २०१४

माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी
माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे
आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे
राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

 कुसुमाग्रज, 

दुःख ना आनंदही

दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही ॥धृ.॥

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा ॥१॥

याद नाही, साद नाही ना सखी ना सोबती
नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती ॥२॥

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली दूरची हाले हवा ॥३॥

एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा
जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्य ना ॥४॥

गीत : आरती प्रभू

समईच्या शुभ्र कळ्या

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;
केसातच फुललेली जाई पायांशी पडते. ॥धृ.॥

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे;
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे. ॥१॥

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. ॥२॥

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ग ये. ॥३॥

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा ! ॥४॥

गीत : आरती प्रभू

सावळाच रंग तुझा

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी

सावळाच रंग तुझा चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या नाग खेळती विखारी

सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी
आणि नजरेत तुझ्या नित्य नादते पावरी

सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंदर पाहू केव्हा उगवतो

सावळाच रंग तुझा करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान


-ग.दि.माडगूळकर