शुक्रवार, ४ जुलै, २०१४

हीच दैना....

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.


आकाशाची निळी भाषा
ऐकता न उरे पोच;आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;तरी मुके तिचे दु:ख,हीच दैना हीच दैना.

विंदा करंदीकर

पावसाच्या धारा येती झरझरा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभवाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ झळके सतेज
ढगांवर वीज,
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारेकाया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फारनाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
झाडांचिया तळीडोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूरलोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवीचित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला ओझरउजळे आकाश
सूर्य येई ढगांतूनउधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले
धरणी हासलीसुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली
कवयित्री - शांता शेळके

गुरुवार, ३ जुलै, २०१४

जगत मी आलो असा की...

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

(रंग माझा वेगळा ह्या काव्यसंग्रहातून)

सुरेश भटांची कविता

ओठी तुझ्या न आले...

अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही ...

 येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही ...

 हे दु:ख राजवर्खी, ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही ...

 त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही...

 जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही...

 झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही ...

 गर्दित गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही ...

 जावे कुण्या ठिकाणी उध्वस्त पापियांनी
संतांतही घराच्या राखेस भाव नाही ...

उच्चारणार नाही कोणीच शापवाणी
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही ...

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
 हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही ...

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही...

सुरेश भट.

सूर मागू तुला मी कसा?

सूर मागू तुला मी कसा

जीवना तू तसा, मी असा ॥धृ.॥

तू मला, मी तुला पाहिले
एकमेकांस न्याहाळीले
दुःख माझा तुझा आरसा ॥१॥

एकदा ही मनासारखा
तू न झालास माझा सखा
खेळलो, खेळ झाला जसा ॥२॥

खूप झाले तुझे बोलणे
खूप झाले तुझे कोपणे
मी तरीही जसाच्या तसा ॥३॥

रंग सारे तुझे झेलुनी
शाप सारे तुझे घेउनी
हिंडतो मीच वेडापिसा ॥४॥

काय मागून काही मिळे ?
का तुला गीत माझे कळे ?
व्यर्थ हा अमृताचा वसा ॥५॥

गीत : सुरेश भट

प्रेम कर भिल्लासारखं...

पुरे झाले चंद्र-सुर्यपुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी नालेपुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,

जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिलातुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.
शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?

डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,

जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,

प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,

बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!
कवी - कुसुमाग्रज

बुधवार, २ जुलै, २०१४

लिटमस पेपर

मला आजही आठवतो
शाळेतला तो विज्ञानाचा तास,
सरांचं हळद आणि साबणाच्या पाण्याचं उदाहरण,
आम्ल आम्लारीची कसोटी,
आणि त्यासाठी वापरलेले लिटमस पेपर...
आम्ही तेव्हा अलगद टाकायचो
साबणाच्या पाण्यात चिमुटभर हळद,
अन बदलत्या रंगांसरशी
उत्साहाने हात वर करायचो,
सरांना प्रयोगाचे निष्कर्ष सांगण्यासाठी...
आजच्या वास्तव जीवनातही
बदलत आहेत रंग
प्रत्येक प्रयोगाबरोबर,
कधी भगवे,
कधी हिरवे,
कधी निळे,
तर कधी आणखी काही...
मात्र आता सारेच रंग झालेत हळदीसारखे,
आणि समाज घुसळून घुसळून फेसाळलेल्या
साबणाच्या पाण्यासारखा,
त्यात कोणताही रंग टाका,
फेसाळलेल्या पृष्ठावर तरंगू लागतात लाल तवंग,
जात धर्म पंथ यांच्या पलीकडला रंग
जो धावतो अव्याहतपणे प्रत्येक माणसाच्या नसानसातून,
तोच आता वाहू लागलाय,
राजरोस बेबंदपणे चौकाचौकात रस्त्यांवरून
या रंगीत प्रयोगांच्या शर्यतीत...
या प्रयोगांचे निष्कर्ष
ठरताहेत अनाकलनीय,
किंबहुना निष्कर्ष काढणंच कठीण झालयं,
कारण कुठेतरी हरवलाय,
माणसातल्या माणूसपणाचा लिटमस पेपर...